बिनमांज्याचे व ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये
जुन्नर- निसर्गाचे देणे लाभलेल्या नयनरम्य माळशेज घाटात (जि. पुणे) माळशेज पतंग महोत्सवाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून येत्या 10 ते 12 तारखेदरम्यान येथील पर्यटक निवासाच्या परिसरात आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
प्रथमच आयोजित होत असलेल्या या महोत्सवाची बिनमांज्याचे पतंग व ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. हा महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशू, पक्ष्यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार नाही. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेज घाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांनी केले आहे.
- लुटा बैलगाडी सफारीचा आनंद-
या महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार असून, ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादित शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.