Kiran Mane Join Shiv Sena : आपल्या राजकीय वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले आहे. माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मागच्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज अखेर शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना,”शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेलं असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे”.असे त्यांनी म्हटले आहे.
एक उत्तम अभिनेता म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजे किरण माने.
त्यांनी ‘शिवबंधन‘ बांधून आजपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली तो क्षण! pic.twitter.com/6sFlrM9Vfw— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 7, 2024
पुढे बोलताना किरण माने यांनी,”संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल”. किरण मानेंनी शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले,”तुम्हाला जे पाहावत नाही ते खरं आहे. माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही”.असे सांगितले.
दरम्यान, किरण माने यांच्यासह बीड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”बीडच्या निर्भिड शिवसैनिकांनो स्वागत. बीडकडे युतीमुळे आणि मुंडे साहेबांमुळे दुर्लक्ष झालं होतं. मात्र आता पालवी फुटत आहे. त्याचं आता वृक्ष होत आहे. मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी बीडमध्ये एक मोर्चा झाला होता. आता शेतकऱ्यांसाठीदेखील एक मोर्चा करणार आहे. तुम्ही नियोजन करा मी येणार. बीड मला पूर्णपणे शिवसेनामय करुन हवं”.असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.