खालापूर : शहरातील वासरंग रस्त्यावर महिंद्रा सानयो कारखान्यात कामावर जात असताना तेजस सुरेंद्र भाई थडार या अधिकाऱ्यावर स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात थडार यांना जखमी हल्लेखोर लौजीच्या दिशेने पसार झाले. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने कंपनी परिसरात खळबळ उडाली आहे.
तेजस थंडार हे महिंद्रा सोनयो या कारखान्यात स्टोअर विभागाचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. थंडार हे 14 जानेवारीच्या सकाळी माऊंट या सोसायटीतून आपल्या दुचाकीवरून कंपनीकडे जात असताना वासरंग रस्त्यावर स्मशानभूमीजवळ 25 ते 30 वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा स्कूटीने विरोधी दिशेने आले. हल्लेखोरांनी त्यांच्या बाईकचा रस्ता रोखला.
थंडार यांच्यावर लोखंडी पाईपने अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या थंडार जखमी झाले. त्याचवेळी कंपनीत जाणाऱ्या काही कामगारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून मराठीत “चिपकवू का’, असे बोलल्याने पुढे मदतीसाठी आलेले कामगार मात्र मागे सरकले. त्यानंतर ते तरुण लौजी दिशेने स्कूटीने पसार झाले.
दरम्यान थडार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर स्वरुपाच्या जखमा आहेत. गुरुवारी रात्री उशिरा औषध उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनाजी शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पाटील तपास करीत आहेत.