वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नवनिर्वाचित आणि नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे छायाचित्र फॅशनसाठी वाहिलेल्या वोग या मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे. मात्र मुखपृष्ठवरील हे छायाचित्र आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या छायाचित्रात कमला हॅरीस यांच्या त्वचेचा रंग संगणकाच्या मदतीने अधिक उजळ करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
दोन छायाचित्रे प्रकाशित झाली असून त्यातील एक डिजिटल एडिशनसाठी वापरले जाणार आहे. हलक्याशा हिरव्या रंगाच्या भिंतीवरील गुलाबी रंगाच्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर कमला हॅरीस उभ्या असल्याचे छायाचित्रात दिसते. दुसऱ्या छायाचित्रात त्यां पिवळसर पडद्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या आहेत आणि त्यांनी पावडर ब्लू रंगाचा सूट परिधान केला आहे. दोन्ही छायाचित्रांमध्ये त्यांच्या चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग उजळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या आधी अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांची छायाचित्रे व्होग मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाली आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांची त्वचा उजळ करण्याच्या भानगडीत कुणी पडले नव्हते. ही बाब सोशल मिडियावर अनेकांनी नजरेस आणून दिली आहे. कमला हॅरीस यांच्या छायाचित्रामध्ये बदल करण्यात आल्याची बातमी ही छायाचित्रे लीक झाल्यानंतर त्यांच्या टीमपर्यंत पोचली. मात्र आतापर्यंत त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ही छायाचित्रे टायलर मिशेल या छायाचित्रकाराने काढली आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर ती पोस्ट केली. त्यानंतर सोशल मिडियावर त्याबाबत जोरदार वादंग निर्माण झाले. छायाचित्रात हॅरीस यांच्या त्वचेच्या रंगात बदल करण्यात आल्याचे अनेकांना आवडले नाही. वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक रॉबिन गिवान यांच्या मते, असे करुऩ कमला हॅरीस यांचा सन्मान ठेवला जात नाही.
वोग मासिकाच्या मुख्य संपादक अॅना विंटर यांनी छायाचित्रांमध्ये हॅरीस यांच्या त्वचेचा रंग उजवळल्याचे (व्हाईटवॉश)नाकारले आहे. त्यांची ही अनौपचारिक छायाचित्रे असून त्यातून त्यांचा सहजस्वभाव प्रकटतो. बायडेन-हॅरीस प्रशासनाचे रुप त्यातून दिसते असे त्या म्हणाल्या. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची तर जो बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.