– विनोद मोहिते
इस्लामपूर – आजच्या लष्कर दिना दिवशी दिल्लीत झालेल्या ७२ व्या लष्करी दिनाच्या संचालनात कॅप्टन रूचिका प्रकाश पाटील यांनी सहभाग नोंदवला. इस्लामपुरकर कन्येच्या सहभागाने पाटील कुटूंबीयावर आनंदाचा वर्षाव होत आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचलन झाले. यात भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेच्या देदीप्यमान परंपरेचे देशवासीयांना दर्शन घडविले गेले.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील लष्करी तळावर कॅप्टन रूचिका प्रकाश पाटील कार्यरत आहेत.
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के.एम.करिअप्पा यांनी देशाच्या लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून सुत्रे हातात घेतली. ब्रिटीश अधिकारी कमांडर फ्रान्सिस बुचर देशाचे शेवटचे लष्करी अधिकारी ठरले. तेव्हापासून गेली ७२ वर्षे १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.
याविषयी दिल्लीच्या कॅन्टोनमेंट परिसरातील करिअप्पा परेड मैदानावर लष्कारातील सर्व विभागाचे संचलन केले जाते. या परेडमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना दिली जाते. या आर्मी परेड डेमध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र हे सर्वोच्च पुरस्कार वगळता शौर्यपदक, सेनापदक, वीरचक्र व इतर पुरस्कारांनी देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केलेल्या सैनिकांचा व अधिका-यांचा लष्करप्रमुखांच्याहस्ते गौरव केला गेला.
उत्कृष्ट कामगिरी-
कॅप्टन रूचिका या निवृत्त कर्नल प्रकाश शंकरराव पाटील यांच्या कन्या, तर डॉ. विश्वास पाटील – खेडकर यांच्या पुतणी आहेत. कॅप्टन रूचिका यांनी लष्करी सेवेतील सर्वात खडतर प्रशिक्षण देणा-या चेन्नईच्या यंग आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधील गुणवत्तेच्या जोरावर सप्टेंबर २०१४ मध्ये लष्करी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात त्यांनी कॅप्टन पदावर मोहर उमटवली.