खडकवासला,(विशाल भालेराव) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणी पदावर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी खडकवासला गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मात्र डावलल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.
खडकवासला गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेले असताना तसेच पक्षात अनेक वर्षे काम केलेले असतानाही खडकवासला गावात एकही पद दिले गेले नसल्याने दिपक मते, नीलेश मते, रूपेश मते या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत पक्षातील वरिष्ठांना निवेदन देणार असल्याचेही सांगण्यात आले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गणेश मोहिते, विकास दांगट, शैलेश चरवड, संतोष फरांदे, नमेश बाबर,राहुल घुले, स्वाती पोकळे, युवराज मोरे, अनिता इंगळे, निलिमा डोळसकर, बाळासाहेब कापरे, देवेंद्र धायगुडे यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे तर सरचिटणीस म्हणून अश्विनी खाडे, संजय हिंगे, संदीप उदमले, वसंतकुमार भाटिया, निवृत्ती यनपुरे, राजेंद्र बरगे, दिवाकर पोफळे, यशवंत ठोकळ यांची तर चिटणीसपदी नितीन पाटील, मीना भोसले, शैलेंद्र चव्हाण, महिंद्र भोसले यांची निवड झाल असून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी पदावर कुमार गोसावी, सचिन दोडके, आप्पा रेणुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नावांत खडकवासलातील काही प्रमुख नावे डावलली गेल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खडकवासला गावाला सामाजिक, ऐतिहासिक तसेच राजकीय परंपराही लाभली आहे. गावातील अनेक मातब्बरांचे राजकीय नेतृत्व म्हणून अनेकांचे मोठे योगदान आहे, असे असताना खडकवासला गावच्या पंचक्रोशीतील महत्त्वाच्या गावात पक्षाने एक तरी महत्त्वाचे पद द्यायला हवेत होते. गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही पद नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. – दीपक मते, खडकवासला, राष्ट्रवादी