नवी दिल्ली : जगभरात १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे आणि यात फेसबुकचेही मोलाचे योगदान मिळाले आहे. संबंधित तरुण सिग्नेचर ब्रिजजवळ आत्महत्या करण्यासाठी जात होता. त्याचवेळी फेसबुक ऑफिसमधून दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन आला आणि तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे.
दिल्ली पोलीस सायबर सेलचे डीसीपी अनयेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला अचानक आयर्लंडमधील फेसबुकच्या कार्यालयातून फोन आला. दिल्लीत एक तरुण आत्महत्या करायला जातोय. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरुन तशी अॅक्टीव्हीटी समोर आली आहे.
फेसबुकचा फोन पोलिसांनी गांभीर्याने घेत संबंधित तरुणाचे लोकेशन ट्रेस केले तर तो सिग्नेचर ब्रिजजवळ असल्याचे आढळून आले. तरुणाच्या लोकेशनचा पत्ता लागल्यानंतर पोलिसांना तात्काळ संबंधित वायरलेस पोलिसांच्या कानावर माहिती टाकली आणि अलर्ट करण्यात आले.
पोलिसांनी यासाठी संबधित तरुणाच्या भावाचीही मदत घेतली आणि त्याला फोन करायला सांगून बोलण्यात व्यग्र ठेवले. त्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि आत्महत्या करण्यापासून रोखले. अशापद्धतीने फेसबुक आणि पोलिसांमुळे एका तरुणाचा जीव वाचू शकला. तरुणाचे तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले आणि कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे.