‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘टायगर जिंदा है’ च्या नंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा अली अब्बास जाफरच्या सिनेमामध्ये काम करणार आहे. हा सिनेमा एक सुपर हिरो ऍक्शन फिल्म असणार आहे. बॉलिवूडमध्ये यापूर्वीही सुपर हिरोवरती सिनेमे होऊन गेले आहेत.
मात्र हा पहिला असा सिनेमा असेल, ज्यामध्ये एक हिरोईन लीड रोल साकारणार आहे. ‘सुपर सोल्जर्स’ या सुपर हिरो फिल्ममध्ये कतरिना कैफ सुपर हिरो म्हणून दिसणार आहे. सध्या या सिनेमाची निर्मितीपूर्वीची तयारी सुरू आहे. “सुपर सोल्जर्स’चे शुटिंग अनेक देशांमध्ये होणार आहे.
आबू धाबी, दुबई, पोलंड, जॉर्जिया आणि भारतामध्ये ‘सुपर सोल्जर्स’चे शुटिंग होणार आहे. शुटिंगसाठी अली अब्बास जाफर यांनी अनेक लोकेशन निश्चित केली आहेत. कतरिना लीड रोल साकारणार आहे. मात्र सिनेमामध्ये कोणीही हिरो असणार नाही. जाफर यांच्या मते या सिनेमामध्ये कोणाही पुरुष हिरोची आवश्यकताच नाही. त्यामुळे अर्थातच या सिनेमामध्ये काहीही रोमान्स असणार नाही. सिनेमात रोमॅंटिक गाणेही असणार नाही. ‘सुपर सोल्जर्स’ची सगळी भिस्त कतरिनाच्या खांद्यावर असेल. यातील ऍक्शन रोलसाठी कतरिना लवकरच मार्शल आर्टचे ट्रेनिंग देखील घ्यायला सुरुवात करणार आहे.