रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार हिरो असलेल्या या सिनेमामध्ये कतरिना कैफ असणार आहे, एवढेच समजले होते. पण तिचा रोल नक्की कसा असेल, हे कोणालाच माहिती नव्हते. मात्र आता रोहित शेट्टीने याबाबतचा खुलासा केला आहे. कतरिना एका डॉक्टरच्या रोलमध्ये दिसणार आहे. असा डॉक्टरचा रोल तिच्यावाट्याला पहिल्यांदाच आला आहे. सेटवर ती डायरेक्टरला ती सारखे काही ना काही प्रश्न विचारत असते. त्यामुळे तिला “क्वीझ मास्टर’ असे टोपणनाव पडले आहे, असे रोहित शेट्टीने सांगितले.
“सूर्यवंशी’मध्ये अक्षय आणि कतरिना बऱ्याच दिवसांनंतर एकत्र आले आहेत. या दोघांशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंह हे दोघेही “सूर्यवंशी’त पाहुणे कलाकार म्हणून असणार आहेत. “सिंघम’ आणि “सिंबा’तील पोलीस अधिकाऱ्यांच्या रोलमध्येच हे दोघेजण सिनेमात दिसणार आहेत. अक्षय देखील पोलीस अधिकारीच असणार आहे. त्यामुळे त्या रोलच्या अनुषंगानेच या दोघांनाही जागा दिलेली असेल. याशिवाय गुलशन ग्रोवर, नीना गुप्ता, सिकंदर खेर यासारखे कलाकारही “सूर्यवंशी’मध्ये असणार आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.