पुणे –पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज दूध डेअरी संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये छाननीत नऊ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, बुधवारी एका उमेदवाराने माघार घेतली आहे. दरम्यान, तालुका प्रतिनिधी गटातील हवेली आणि पुरंदरमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे संचालक पदाच्या 14 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 8 मार्चपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट
होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. ही निवडणूक 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यानंतर मार्चमध्ये आलेले करोनाचे संकट यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या. जिल्हा दूध संघासाठी 16 संचालक पद आहेत. या निवडणुकीसाठी एकूण मतदार 709 आहेत.