पुणे- कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह धंगेकर आपल्या उमेदवारीचा फॉर्म भरणार आहेत.
उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी यांनी केसरीवाड्यात जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेतली. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झालेली असताना भाजपने या निवडणुकीत टिळक घरात उमेदवारी दिलेली नाही अशात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक यांची भेट घेतली आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याशी माझा वीस वर्षांपासून संपर्क होता. आज टिळक कुटुंबीयांची भेट आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत कसब्यात पाहायला मिळणार आहे.
कसब्यात बॅनरबाजी
“कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?” असा सवाल कसब्यात बॅनरद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या बॅनर्सची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. हे बॅनर्स नेमके कोणी लावले हे समजू शकलेलं नसलं तरी यामुळे आता राजकीय वातवरण तापायला सुरुवात झाली आहे. समाज कुठवर सहन करणार ? एक जागरूक मतदार असा आशय देखील बॅनरवर पाहायला मिळतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी बॅनरबाजी सुरु झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते.