आळंदी, – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीच्या (आळंदी यात्रा) पार्श्वभूमीवर आळंदीत नगरपरिषद, पोलीस, माऊली संस्थान प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. कार्तिकी यात्रेसाठी यावर्षी राज्यभरातून 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाची तयारी सुरु आहे. रविवारी (दि.20) कार्तिकी एकादशी असून मंगळवारी (दि. 22) संजीवन समाधी सोहळा आहे. यात्रेला आल्यानंतर बहुतांश वारकरी हे माऊलींचे दर्शन घेऊनच परतत असतात यामुळे भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही या दृष्टीने माऊली संस्थानकडून दर्शनबारी आणि इतर सेवा-सुविधांची जोरदार तयारी सुरु आहे. मंदिर परिसरातील दर्शनबारीचे काम पूर्णत्वास येत असून इंद्रायणी घाटाच्या पाठीमागील दर्शनबारीचे काम उद्यापासून (दि. 15) सुरु होणार असल्याची माहिती संस्थान कमिटीने दिली आहे.
पहाट पूजेसाठी निमंत्रितांना प्रवेश –
कार्तिक वद्य एकादशीला (दि.20) मुख्य पुजा होणार आहे. एकादशीचे दिवशी पहाटपूजेसाठी निमंत्रितांना रात्री बारा वाजता हनुमान दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. तर पासधारकांना पहाटे 2 ते 3 व दुपारी 2 ते 6 या वेळेत हरिहरेंद्र स्वामी मठाजवळील जिन्यावरून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. विशेष निमंत्रित पासधारक व पारंपारिक मानाच्या सेवांसाठी पासधारकांना हरिहरेंद्र मठाजवळील बारीतून मंदिरात प्रवेश दिला जातो.
यावेळी या प्रवेशद्वारावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या भाविकांना मंदिर प्रवेशासाठी संस्थानचे मानकरी अथवा संस्थानचे सेवक या ठिकाणावरील पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क करतील. तसेच इंद्रायणी तीरावर दत्तघाटावर महापूजा पासधारकांसाठी मंडप उभारण्यात येणार असून पूजाधारक पहाटेपासून ते सकाळी 11 पर्यंत पाण दरवाजातून मंदिरात प्रवेश करतील. दरम्यान, महाद्वार बॅरिकेट्स लावून भाविकांच्या प्रवेशास बंद करण्यात येणार आहे. मात्र, दर्शनानंतर भाविकांना महाद्वारातून बाहेर सोडले जाईल.
“करोनानंतर यंदाचा समाधी सोहळा उत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने माऊली संस्थान कमिटीकडून सर्व सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. भाविकांना पिण्याचे पाणी मंदिर व दर्शनबारीत देण्यात येणार आहे. मंदिरातील सर्व तयारी पूर्णत्वास येत असून भाविकांच्या स्वागतासाठी माऊली संस्थान सज्ज झाले आहे” – ज्ञानेश्वर वीर, व्यवस्थापक, माऊली संस्थान आळंदी
हेही वाचा – Alandi Kartiki Yatra 2022: कार्तिकी यात्रेसाठी 2500 पोलिसांचा बंदोबस्त