नवी दिल्ली – भारत आपल्या संस्कृती आणि सभ्यतेसोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतात बरीच मोठी जंगले आहेत. यामुळे भारताला हरित आणि सुंदर देश म्हटले जाते. याशिवाय भारतात काही धोकादायक जंगलेही आहेत जिथे जाणे जीवावरही बेतू शकते. चला तर, जाणून घेऊया या धोकादायक जंगलांबद्दल… 1. सुंदरबन फॉरेस्ट, पश्चिम बंगाल (Sundarbans Forest, West Bengal) सुंदरबन हे भारतातील सर्वात धोकादायक जंगल मानले जाते. हे पश्चिम बंगालमध्ये आहे. सुंदरबन हे गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. हे जंगल सुमारे 10,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. हे जंगल जगात रॉयल बंगाल टायगरसाठी ओळखले जाते. खाऱ्या पाण्याच्या मगरीही येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशामध्ये भारतातील सर्वात पवित्र नद्या, गंगा, ब्रह्मपुत्रा, पद्मा आणि मेघना या नद्या समुद्राला मिळतात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांत सुंदरबनचे जंगल असून येथील जमीन दलदलीची आहे. 2. गीर जंगल, गुजरात (Gir Forest, Gujarat) गीरचे जंगल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. गुजरातमधील गीरचे जंगल आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. हे धोकादायक जंगल सोमनाथच्या 43 किमी ईशान्येला आणि जुनागढच्या दक्षिण पूर्वेस 60 किमी अंतरावर आहे. 1,412 चौरस किलोमीटर गीर जंगलापैकी 258 किलोमीटर चौरस पूर्णपणे संरक्षित आहे आणि 1,153 किलोमीटर चौरस हे वन्यजीव अभयारण्य आहे. गिरचे जंगल हे जगातील पहिले जंगल आहे जिथे आशियाई सिंह आढळतात. 3. खासी हिल्स फॉरेस्ट, मेघालय ( Khasi Hills Forest, Meghalaya) हे भारतातील तिसरे मोठे जंगल मानले जाते. हे मेघालय, भारतातील खासी पर्वतांच्या मध्ये वसलेले पावसाचे जंगल आहे. दक्षिणेला असलेल्या चेरापुंजीमुळे हे जंगल वर्षातील प्रत्येक दिवशी पावसाने ओले राहते. खासी पर्वतांच्या शिखरावर वसलेले हे जंगल सुमारे 1,978 मीटर उंचीवर आहे. मेघालयात असलेली जंगले मोठ्या भागात पसरलेली आहेत. मेघालय हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे एकूण जमिनीपैकी 75 टक्के पेक्षा जास्त जमीन जंगलांनी व्यापलेली आहे. 4. नामदाफा फॉरेस्ट, अरुणाचल प्रदेश (Namdapha Forest, Arunachal Pradesh) नामदाफा हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. अरुणाचल प्रदेशात वसलेले हे जंगल 1,985 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. भारतातील अत्यंत थंड प्रदेशात असलेल्या या जंगलात असे प्राणी आढळतात, जे भारतात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. या जंगलात रेड पांडा, रेड फॉक्स असे प्राणी आढळतात. 5. जिम कॉर्बेटनॅशनल पार्क, उत्तराखंड (Jim Corbett National Park, Uttarakhand) जिम कॉर्बेट हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. या उद्यानाची निर्मिती 1936 मध्ये नामशेष झालेल्या वाघांच्या संवर्धनासाठी करण्यात आली होती. उत्तराखंडमधील नैनिताल येथे असलेल्या जिम कॉर्बेटचे 520 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. हे जंगल बंगाल टायगरसाठी ओळखले जाते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असल्याचे म्हटले जाते.