बॉलीवूड इंडस्ट्री लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. अनेक महिने बंद असलेल्या चित्रपटांचे काम पुन्हा सुरू झाले असून कलाकार आपल्या प्रॉजेक्टसाठी सेटवर वापसी करत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनदेखील कामावर परतला आहे. यासंदर्भात कार्तिकने सोशल मीडियावर माहिती देत “धमाका’ करणार असल्याचे सांगितले. कार्तिक आर्यनने सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असताना दिसत आहे. तर अन्य एका फोटोत त्याच्यासोबत त्याची आई मास्कमध्ये दिसत आहे.
या फोटोसह कार्तिकने पोस्टमध्ये लिहिले की, प्रभूचे नाव घेऊन सुरू करणार धमाका, पण पाहा आईच्या चेहऱ्यावरील चिंता. कार्तिक आर्यनच्या आईला होत असलेली चिंता रास्त असून सध्या करोना महामारीत शूटिंग करणे जरा धोक्याचे आहे. कारण, चंदीगड येथे शूटिंगदरम्यान वरुण धवन हा करोना पॉझिटिव्ह आढळला होता.
यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. दरम्यान, कार्तिक आर्यनच्या पोस्टवर वरुण धवनने शुभेच्छा देत त्याला खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर “धमाका’चे पोस्टर शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. यात तो एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे, जो मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे रिपोर्टिंग करतो.