बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांच्या प्रकृतीला इजा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या निवासस्थानीच ते बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले. संतोष हे येडियुरप्पा यांचे नातेवाईकही आहेत. गेल्या मे महिन्यात त्यांची मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
गेली अनेक वर्षे ते येडियुरप्पा यांच्या समवेत काम करीत आहेत. येडियुरप्पा हे विरोधी पक्ष नेते असतानाही त्यांनी त्यांचे पीए म्हणूनही काम केले होते. येडियुरप्पा यांच्याशी जवळीक असलेल्या काही जणांच्या विरोधात संतोष यांचे मतभेद निर्माण झाल्याने संतोष हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या.
राज्यातील सत्ताबदलाच्या काळात संतोष यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वता भाग घेऊन राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याचाही त्यांचा इरादा होता.