भालकी – आम्ही पंतप्रधान मोदींसारखी प्रत्येक खात्यात पंधरा लाख भरू, काळापैसा नष्ट करू वगैरेंसारखी खोटी आश्वासने लोकांना देत नाही. कर्नाटकात कॉंग्रेसने जी आश्वासने किंवा हमी येथील जनतेला दिली आहे त्याची पुर्तता आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत करू, अशी ग्वाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील भालकी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिली.
कॉंग्रेसने राज्यातील जनतेला 200 युनिट वीज मोफत, प्रत्येक घरातील एका महिलेला दरमहा दोन हजार रुपयांची मदत, गरीबांना दहा किलो मोफत तांदुळ, युवकांना दरमहा तीन हजार रुपये बेकार भत्ता, अशी आश्वासने दिली आहेत. त्या संबंधात राहुल गांधी यांनी ही ग्वाही दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतही बेकारांना भत्ता दिला जातो त्यामुळे काॅंग्रेसचा हा अमेरिका पॅटर्न असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, संघ आणि भाजपचे लोक लोकशाहीवर सतत हल्ला करीत असून त्यांनी देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे. हे लोक गरीबांकडून पैसा लुटतात आणि तो देशातील काही श्रीमंत मित्रांच्या हवाली करतात असे ते म्हणाले. कर्नाटकात लोकांनी कॉंग्रेसला किमान दीडशे जागा द्याव्यात. जर त्यापेक्षा कमी जागा दिल्या तर भाजपचे लोक पुन्हा पक्ष फोडतील आणि राज्यातील सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न करतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.