रांजणगाव गणपती -कारेगाव (ता. शिरूर) येथे करोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे संबंधित रुग्ण ज्या परिसरामध्ये राहत होता. त्या परिसरात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, आरोग्य विभागाचे अधिकारी आर. डी, शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच अनिल नवले यांनी दिली. शासकीय नियमानुसार करोनाचा रुग्ण आढळून आल्यावर संबंधित तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतो.
मात्र, लगतच्या औद्योगिक वसाहतींचा विचार करता कंपनीमध्ये कामाला येणाऱ्या कामगारांचा विचार करता कारेगाव येथील संबंधित रुग्ण असलेल्या परिसरच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहत चालूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही शासनाने ज्या कंपन्या प्रतिबंधित क्षेत्रामधून कामगारांची ने-आण करीत आहेत. त्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नवले यांनी केली आहे. काही कंपन्या काम करताना सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.