कराड – कराडमधील सुरेखा अर्जुन माने (वय 30, रा. वडार वस्ती) यांचा प्रसूतीनंतर तिसऱ्याच दिवशी, सोमवारी (दि. 23) दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाइक व नागरिकांनी केली. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत त्यांनी मंगळवारी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मारला. यामुळे रुग्णालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.
याबाबत नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वडार वस्तीतील राहणाऱ्या सुरेखा माने यांना प्रसूतीसाठी नातेवाइकांनी गुरुवारी (दि. 19) उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे शुक्रवारी (दि. 20) सिझेरियन होऊन, त्यांनी मुलाला जन्म दिला.
त्यानंतर दिवसभर त्यांची प्रकृती चांगली होती; परंतु शनिवारी (दि. 21) सकाळी डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. त्यांचा सोमवारी (दि. 23) रात्री मृत्यू झाल्याचे कृष्णा रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले नातेवाइक व वस्तीतील नागरिक मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात जमले. सुरेखा माने यांच्या मृत्यूला दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी जमावाने केली.
“मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पिसाळ, जिल्हाध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष आनंदा सावंत, दशरथ धोत्रे, महेश अलकुंटे, नवनाथ पवार, अनिल चौगुले, श्रीकांत भोसले, अमोल शिंदे, महेश धोत्रे उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.