कराड -कराड नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत बाराडबरे येथे थीम पार्कची निर्मिती केली आहे. येथे ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. याबरोबरच “वेस्ट टू वेल्थ’ धोरण राबवले जाणार आहे. सुक्या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी उभारलेल्या 600 चौरस मीटर आकाराच्या शेडच्या क्रॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाला.
या शेडमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, निर्मिती आणि संशोधन केले जाणार आहे. याबरोबरच त्याचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. याप्रसंगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, विरोधी गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, मोहसीन आंबेकरी, फारुक पटवेकर, आप्पा माने, सुहास जगताप, सुनंदा शिंदे, अख्तर आंबेकरी, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नोडल ऑफिसर रफीक भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर बारा डबरे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीस प्राधान्य दिले आहे. पहिली दोन शेड उभारली असून तिसऱ्या शेडमध्ये “वेस्ट टू वेल्थ’ धोरणानुसार सुक्या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्था, कचरावेचक, भंगार व्यावसायिक यांच्या अर्थार्जनाला चालना देण्यात येणार आहे. टाकाऊ वस्तूंपासून नव्या वस्तू बनवण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. बारा डबरे येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या मंजूर डीपीआर अंतर्गत जुना कचरा हटवून थीम पार्क साकारत आहे. येथे 300 मे. टन. क्षमतेचे ओला कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र व 50 मे. टन क्षमतेचे सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र उभारले आहे.
यासाठी 900 व 300 चौरस मीटरची दोन शेड उभारली आहेत. तिसरे शेड 600 चौरस मीटरचे असून यात सुक्या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात येणार आहेत. या शेडमध्ये या पद्धतीने बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच त्याची निर्मिती करण्याबाबत गरजू तसेच संस्थांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टाकाऊ वस्तू पूर्णपणे वेगवेगळ्या जमा करून त्याची पुन्हा विक्री करण्यात येणार आहे. यापासून नगरपालिकेस उत्पन्न मिळणार आहे. हे थीम पार्क पालिकेचे खास वैशिष्ट्य ठरावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.