कराड – कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधून आणखी सात करोनामुक्त रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून स्थलांतरीत करण्यात आलेले सर्व 31 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माण तालुक्यातील 25 वर्षांच्या युवकानेही करोनावर मात केल्याने त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, कराडच्या मंगळवार पेठेतील 65 वर्षांच्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहर करोनामुक्त झाले आहे.
सह्याद्री रुग्णालयातून शुक्रवारी घरी सोडण्यात आलेल्या सात रुग्णांपैकी चार पुरुष व तीन महिला आहेत. 49 वर्षांचा पुरुष व 45 वर्षे वयाच्या दोन महिला मलकापुरातील तर 40 वर्षांचा पुरुष व 60 वर्षांचा वृद्ध वनवसमाचीतील आहे. उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षांचा कर्मचारी व मंगळवार पेठ, कराड येथील 65 वर्षांच्या महिलेचाही यात समावेश आहे. शहरातील महिला करोनामुक्त झाल्याने कराडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या सात रुग्णांना 28 एप्रिल ते 7 मे या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल बुधवारी (दि. 20) निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, कराड पालिकेच्या नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, सह्याद्री हॉस्पिटलचे मुख्य फिजिशियन डॉ. संदीप बानुगडे, संचालक अमित चव्हाण, डॉ वेंकटेश मुळे, डॉ. पुष्कर ढिकले, विश्वजित डुबल उपस्थित होते. आतापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक करोनामुक्त झाले आहेत.