बंगळुरु – कन्नड टीव्ही मालिकेतील गीता आणि दोरेसानी यांसारख्या मालिकेमध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होत होते. कधी-कधी प्रसिद्धी मृत्यूचे कारण ठरू शकते. आजचा प्रसंगही तसाच घडला आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचे वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीचा मृत्यू बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर झाला आहे. अभिनेत्रीच्या अशा जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीवर 16 मे रोजी रुग्णालयात ‘फॅट फ्री’ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले. फुफ्फुसात पाणी शिरल्याने संध्याकाळी तिच्या तब्येतीत काही बदल झाले. तेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास झला होता. त्यानंतर तिचा रुग्णलयातच मृत्यू झाला.
अभिनेत्रीने या शस्त्रक्रियेबाबत तिच्या आई-वडिलांना माहिती दिली नव्हती. तिच्या मैत्रीणींसोबत ती शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा चेतनाचे पालकांनी केला आहे.
याप्रकरणी पोलीसात रुग्णालय समितीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे. चेतनचा मृतदेह हा बंगळुरुमधील हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रमाय्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.