नवी दिल्ली – प्रभावी भाषणशैलीमुळे कॉंग्रेसची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे तरूण नेते कन्हैय्या कुमार यांना पक्षाने बढती दिली आहे. त्यांना नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयुआय) प्रभारी बनवण्यात आले आहे.
एनएसयुआय ही कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असताना कन्हैय्या प्रसिद्धी झोतात आले. काही घटना आणि वक्तव्यांमुळे ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले. पण, त्यांच्यातील नेतृत्व आणि वक्तृत्व गुण हेरून कॉंग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश दिला.
त्यानंतर ते कॉंग्रेसचे एक महत्वाचे प्रचारक बनले आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत ते पूर्णवेळ सहभागी झाले. आता त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काही महिन्यांत विविध राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय, लोकसभा निवडणुकही नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुका विचारात घेऊन अधिकाधिक युवकांना आपल्याकडे खेचण्याचा संकल्प कॉंग्रेसने केलेला दिसतो. कन्हैय्या यांच्या नियुक्तीमधून तसे संकेत मिळत आहेत.