वॉशिंग्टन: अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरीक कमला हॅरीस यांनी सन 2020 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी स्व:ताच आपल्या ट्विटर संदेशातून ही घोषणा केली आहे. आपण अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली असली तरी लोकांचा लढा आपण रोज लढतच राहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. त्यांनी आपला प्रचारही जोरात चालवला होंता पण त्यांना मतदारांचा प्रतिसाद मात्र फारच कमी होता. त्यांच्या मतांमध्ये सतत घटच होताना दिसून आली होती. अलिकडच्या मतदान चाचण्यांमध्ये त्यांना केवळ तीन टक्के इतकीच मते मिळाल्याने त्यांनी या निवडणुकीतून आज आपली माघार घोषित केली. त्यांनी मतदारांचे आभार मानतानाच अत्यंत खेदाने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आपली उमेदवारी जाहीर करणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या होत्या. गेल्या जानेवारी महिन्यात त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या समर्थकांची जी पहिली सभा झाली होती त्याला तब्बल 20 हजार नागरीक उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पण नंतरच्या टप्प्यात मात्र त्या मतदारांना आकर्षित करण्यास प्रभावी ठरू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना यातून माघार घ्यावी लागली आहे.