वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या कमला देवी हॅरिस या कृष्णवर्णिय सिनेटर महिलेची प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडले गेल्याने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीत अश्वेत जनतेला आकर्षित करण्यात बिडेन यांना मोठे बळ मिळणार आहे.
कॅलिफोर्नियातील सिनेटर असलेल्या कमला हॅरिस या उपाध्यक्षपदासाठी निवडल्या गेलेल्या तिसऱ्या महिला उमेदवार आहेत. यापूर्वी अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन यांना 2008 साली आणि न्यूयॉर्कच्या लोकप्रतिनिधी गेराल्डाईन फरेरो यांना 1984 साली उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडण्यात आले होते.
हॅरिस यापूर्वी बिडेन यांच्या विरोधी होत्या. मात्र नंतर त्या बिडेन यांच्या समर्थक बनल्या. त्या स्वतः अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी इच्छुक होत्या. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी प्रचारासाठी आवश्यक आर्थिक बळाच्या अभावी तो नाद सोडून दिला होता. अमेरिकेच्या सिनेटमध्ये असलेल्या आशियाई अमेरिकन सिनेटरपैकी त्या एक आहेत. सिनेटमध्ये निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला आहेत.
हॅरिस अनेक बाबतीत पहिल्या ठरल्या आहेत. यापूर्वी त्या प्रांताच्या डिस्ट्रीक्ट ऍटर्नी, सॅन फ्रान्सिकोसाठीच्या डिस्ट्रीक्ट ऍटर्नीही होत्या. या उपाध्यक्षा झाल्यास महिला म्हणून, आफ्रिकन-अमेरिकन महिला, जन्माने भारतीय-अमेरिकन असलेल्या आणि आशियाई-अमेरिकन अशा आणखीही अनेक बाबतीत त्या पहिल्याच ठरतील. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे जमैकाचे तर आई शामला गोपालन या भारतीय होत्या. शामला गोपालन या कॅन्सर तज्ञ आणि नागरी हक्क कार्यकर्त्याही होत्या. मात्र त्या स्वतःला फक्त अमेरिकन म्हणवून घेत असत.
आई वडील विभक्त झाल्यावर कमला आणि माया या दोघी बहिणींचा सांभाळ शामला गोपालन यांनी भारतीय हिंदू संस्कारांनी केला. कॅनडामध्ये बालपण गेलेल्या कमला हॅरिस यांनी मॉन्ट्रीयल विद्यापिठात अध्यापनही केले. हार्वर्ड विद्यापिठातून उच्च शिक्षण आणि कॅलिफोर्निया विद्यापिठातून कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर अल्मांडा प्रांतात डिस्ट्रीक्ट ऍटर्नी म्हणून त्यांनी काम सुरू केले. 2003 मध्ये त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या आणि 2010 साली कॅलिफोर्नियाच्या ऍटर्नी बनल्या.