क्षमतेच्या फक्त 25% बाधित घेत आहेत उपचार
पुणे – शहरातील नवीन करोनाबाधितांचा आकडा घटू लागला आहे. तर करोनामुक्तांचा आकडाही लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे महापालिकेची 8 कोविड केअर सेंटर तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत.
जुलैमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुमारे 12 हजार खाटांची सुविधा असलेली सुमारे 21 कोविड केअर सेंटर सुरू केलेली होती. मात्र, यामध्ये आता केवळ साडेतीन हजार बाधित असल्याने रुग्ण नसलेली सेंटर्स निर्जंतूक करून बंद करण्यात येणार आहेत.
शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर संशयित तसेच बाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडत होत्या. त्यामुळे पालिकेने शहरातील मोठी महाविद्यालये-संस्थांची वसतिगृहे, पालिकेचे दवाखाने अशा 21 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केली होती. तेथे उपचारांसाठी आवश्यक सुमारे 12 हजार बेड्स, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, त्यातील 8 पैकी काही सेंटर्स बाधित नसल्याने अजून सुरूच करण्यात आलेली नव्हती. तर 3 ते 4 ठिकाणी अवघे काहीच बाधित उपचार घेत आहेत. त्यामुळे ही सेंटर्स टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहेत. त्यात सिंहगड महाविद्यालयाचे एक वसतिगृह, कृषी महाविद्यालयाचे वसतिगृह, येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर वसतिगृह अशा कोविड केअर सेंटरचा समावेश आहे.
नवे बाधित पुन्हा दीड हजारपार
बुधवारी नव्याने 1,584 बाधित सापडले. तर 1,449 बाधित करोनामुक्त झाले. दिवसभरात करोनामुळे 28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, शहरातील करोना मृतांची एकूण संख्या 1,621 झाली आहे. बुधवारी दिवसभरात 6 हजार 213 संशयितांची तपासणी करण्यात आली.तर, आणखी 735 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 445 जण व्हेंटिलेटरवर आहेत.