मस्कत : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचे वयाच्या 79व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झाले. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला होता. बेल्जीयम इथं त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांच्या निधनाबद्दल ओमानमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. सुलतान काबूस यांनी 1970 साली त्यांचे वडील, सैद बिन तैमूर यांना सत्तेवरून खाली खेचत सत्ताग्रहण केली होती. तेव्हापासून गेली पाच दशकं त्यांनी ओमानवर आपली सत्ता कायम ठेवली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुलतान यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले होते, असेही मोदी म्हणाले.
दरम्यान ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ओमानचे सांस्कृतिक मंत्री हैथाम बिन तारिक अल सैद यांनी राजेपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
ओमान सरकारने आज याची अधिकृत घोषणा केली. राजघराण्याशी संबंधित अल रोया या वर्तमानपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. देशाचे नवीन राजे सुधारणावादी अणि विकासाचे धोरण यापुढेही कायम ठेवतील, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.