“जर्सी’ सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी शाहिद कपूरचा अपघात झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला चेहऱ्यावर खोलवर जखम झाली आहे आणि तब्बल 13 टाके घालावे लागले आहेत, असे समजले आहे. “जर्सी’मध्ये शाहिद कपूर एका क्रिकेटपटूच्या रोलमध्ये दिसणार आहे. याच रोलसाठी तो दररोज मैदानावर क्रिकेट खेळण्याची कसून प्रॅक्टिस करतो आहे. सध्या या सिनेमाचे शुटिंग चंदिगढमध्ये सुरू आहे.
एका सीनमध्ये त्याला मैदानावर क्रिकेट खेळायचे होते. एका ठिकाणी त्याचा अंदाज चुकला आणि क्रिकेटचा बॉल थेट शाहिदच्या चेहऱ्यावर येऊन आदळला. यामुळे त्याचा ओठ फाटला आणि रक्तबंबाळ झाला. त्याच्या हनुवटीलाही खूप सूज आली आहे. शाहिदला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवले गेले. त्याच्या ओठावर 13 टाके घातले गेले. शाहिद जखमी झाल्याचे समजताच त्याची पत्नी मीरा राजपूत चंदिगढला पोहोचली. पण तोपर्यंत शाहिदची स्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. या जखमेमुळे काही दिवस शाहिद “जर्सी’चे शुटिंग करू शकणार नाही. शाहिदचे पप्पा पंकज कपूर देखील या सिनेमामध्ये त्याच्या मार्गदर्शकाच्या रोलमध्ये असणार आहेत. याशिवाय ऍक्ट्रेस मृणाल ठाकूरही लीड रोलमध्ये दिसणार आहे.