पुणे – राज्य शासनाने नागरिकांसाठी दिवाळी सण साजरा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये करोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिवाळी सण घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
तसेच, यावर्षी नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच दिवाळी पहाट यासारखे कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
मागील सात-आठ महिन्यांत सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिवाळी सण हा यापूर्वी साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
या उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच, नागरिकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापर व सामाजिक अंतरचे पालन करावे, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.