बारामती – न्यायाधीश केवळ गुन्हेगारांना जन्मठेप ते मृत्यूदंडापर्यंत अशा विविध शिक्षा सुनावतात असाच सगळ्यांचा समज आहे. मात्र, न्यायाधीशामध्येही एखादा छायाचित्रकार लपलेला आहे हे बारामतीचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. राठी यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी निसर्गाच्या विविध छटा एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराप्रमाणे कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. पण त्यांनी लॉकडाऊनचे कोणतेही नियम पायदळी न तुडवता आपल्या घरातूनच या छटा टिपून घरात बसूनही छंद जोपासता येतात हे दाखवून दिले आहे.
जिल्हा न्यायालयीन निवासाच्या आसपास असलेल्या झाडावर विहार करणाऱ्या अनेक पक्षांना व सूर्याची किरणे त्यांनी त्यांच्या वजनदार कॅमेऱ्यामधे कैद केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने न्यायालयही बंद असल्याने तेही घरात बसून आहेत.तर पक्षी प्रदूषणमुक्त निसर्ग सानीध्यात बिनधास्त मुक्त विहाराचा आनंद लुटत आहेत. एरवी न दिसणारे पक्षीही सध्या दिसू लागले असूनही केवळ लॉकडाऊनमुळे त्यांचा अभ्यास करता येत नसल्याचे दुख: पक्षीपेमींमध्ये आहे.
पण, घरातबसूनही आपले छंद पूर्ण करू शकतो हे न्यायाधीश राठी यांनी दाखावून दिले आहे. न्यायाधीश राठी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कोकीळ, सातभाई, खंड्या, सूर्य पक्षी असे पक्षी झाडांच्या सावलीचा, प्रदूषण मुक्त निसर्ग त्याचबरोबर अवकाशातील सूर्य, चंद्राच्या छबी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या असून हे त्यांनी एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराप्रमाणे टिपल्याचे जाणवत आहेत.