मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘जयाप्रदा’ थिएटर कॉम्प्लेक्स प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. थिएटरमधील कामगारांनी त्यांच्याविरोधात धाव घेतली होती. या प्रकरणावर अखेर जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे जया प्रदा अडचणीत आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
जया प्रदा यांचे चेन्नईतील रायपेटा या ठिकाणी एक थिएटर आहे. त्याचे नाव ‘जयाप्रदा’ थिएटर कॉम्प्लेक्स असे आहे. जया प्रदा या राम कुमार आणि राज बाबू यांच्यासोबत हे थिएटर चालवत होत्या. या थिएटरमधील कामगारांकडून त्यांनी कर्मचारी राज्य विमा भरण्यासाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात ईएसआयची रक्कम भरली नसल्याने कामगारांनी कोर्टाचे दर ठोठावले होते.
कर्मचारी कोर्टात गेल्यानंतर जया प्रदा यांनी कर्मचार्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. पण चेन्नई न्यायालयाने जया प्रदा यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाठी शिक्षा सुनावली आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
राजकीय कारकीर्द –
दरम्यान, जया प्रदा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयानंतर त्यांनी राजकारणात देखील एंट्री केली. 1994 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जयाप्रदा 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.