लखनऊ – उत्तर प्रदेशातील जौनपुर शहरातील मोहल्ला रोजा अर्जन येथे गुरूवारी रात्री उशीरा तीन मजली घर कोसळून भयंकर घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी परिसरातील लोकांना जेव्हा ही घटना पाहिली तेव्हा त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
जौनपुर शहरात मस्जिदच्या मागे मोहल्ला रोजा अर्जन येथे गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान माती आणि विटांची 70 वर्ष जूनी तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत 11 जण राहत होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये एका शेजाऱ्याचाही समावेश आहेत. घटनेनंतर शुक्रवारी सकाळी प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घर कोसळल्यानंतर जखमींच्या आरोडण्याने शेजाऱ्यांना जाग आली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. जखमी लोक मदत मागत होते. शेजारील लोक मदतीसाठी आले मात्र ते काही करू शकले नाहीत. काही वेळानंतर त्यांच्या ओरडण्याचा आवाजही बंद झाला. शेवटी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच या अपघातातील जखमींना योग्य उपचार आणि बाधितांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.