टाळ्या, थाळीनादातून आरोग्य कर्मचारी, पोलिसांप्रती पुणेकरांनी व्यक्त केली कृतज्ञता
पुणे – दिवसभर शुकशुकाट…सायंकाळी टाळ्या, थाळ्या, झांजा, शंखनादातून नागरिकांनी व्यक्त केलेले धन्यवाद…नागरिकांमधील सकारात्मक भावना..आणि काही वेळांतच निर्माण झालेले चैतन्य, असे वातावरण रविवारी संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार लाखो नागरिकांनी रविवारी सायंकाळी बरोबर 5 वाजता डॉक्टर, नर्सेस, शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लष्कर, पोलीस, अग्निशमन यंत्रणा, शासकीय यंत्रणेतील अधिकारी आदींसह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत, अनोख्या पद्धतीमध्ये धन्यवाद व्यक्त केले.
सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी टाळ्यांचा गजर, शंखनाद, घंटानाद, थाळ्या वाजवल्या आणि काही वेळातच यामध्ये एकसंघता येऊन एका विशिष्ट तालामध्ये नाद झाला. तर अनेक मंदिरांमध्ये घंटानाद आणि आरती करत, करोनाचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. काहींनी यू-ट्युबसारख्या तंत्रज्ञानाचा आधार घेत भावना व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर अनेकांनी “गो-करोना’चा नारा दिला. काहींनी तर फटाके उडवत वातावरणात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला. खिडकी, गॅलरी आणि टेरेसवरून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी धन्यवाद व्यक्त केले. सुमारे अर्धा तास अशा वातावरणानंतर शहरात पुन्हा शांतता, शुकशुकाट दिसला. यानंतर अनेकांनी व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्वीटर आदी समाजमाध्यमांद्वारे आपली भावना व्यक्त केली. तर अनेकांनी बंद मंदिराबाहेरील घंटानाद करून या कृतज्ञता सोहळयात सहभाग घेतला. तर सिंहगड रस्ता, डेक्कन, कोथरूड तसेच काही उपनगरांमध्ये मात्र चक्क फटाके उडवले.
महापौर, पोलिसांचाही सहभाग
दरम्यान, सर्वसामान्यांसह, सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह नगरसेवकांनी आपल्या घराच्या गॅलरीत येत टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. या शिवाय, पोलीस आयुक्तालयात ड्युटीवर हजर असलेल्या तसेच शहरात कर्फ्यूसाठी खडा पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही या कृतज्ञता उपक्रमात सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या घरी घंटानाद करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोलिसांना घालावा लागला आवर
शहराच्या काही भागात अनेक उत्साही कार्यकर्ते गर्दी करून रस्त्यावर आले. तर काही जणांनी दुचाकी वाहने रस्त्यावर काढत गर्दी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, पोलिसांनी तातडीनं याची दखल घेत अशा प्रकारे अतिउत्साही कार्यकर्त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला तसेच पुन्हा रस्त्यावर आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.