बाळापूर : जालन्यातील मराठा आंदोलनात पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरून अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध दर्शवण्यात आला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा शेळद फाट्यावर पोहचताच हा विरोध करण्यात आला. जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त करणाऱ्यांना बाळापूर पोलिसांनी अटक केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून अनेक मराठा तरुण व भगिनींना जखमी केले या घटनेच्या निषेधार्थ अकोला ते खामगाव मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संवाद यात्रेसाठी अकोला येथे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात देवानंद साबळे गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे, अंकित डीवरे,यांच्यासह अनेकांचा सहभाग होता यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.