बारामती (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार जय पाटील यांच्याकडे शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून इम्तियाज शिकीलकर काम पाहत होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर जय पाटील यांना संधी देण्यात आले आहे . बारामती नगरपरिषदेमध्ये दहा वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. बारामती नगर परिषदेत समावेश होण्यापूर्वी तांदुळवाडी गावचे ते पाच वर्ष सरपंच राहिले आहेत. नगरपरिषदेत आरोग्य सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जय पाटील यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा दिली आहे.
विविध पदांच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी मला शहराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.