मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना काही दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, आता अंबानी दाम्पत्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारमधील दरबंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्यात आली असून रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून धमकी दिली होती. मुकेश अंबानी धमकी प्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे.
बिहारच्या ब्रह्मपुरा गावात राहणाऱ्या राकेश कुमारला बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी 4 च्या दरम्यान साध्या वेशात पोलिस राकेशच्या घरी पोहचली. पहिल्यांदा पोलिसांनी राकेशच्या मोबाईलवर कॉल केला. त्यानंतर राकेशने कॉल रिसिव्ह केला. राकेशच्या मोबाईलचे लोकेशन कन्फर्म झाल्यानंतर पोलिसांनी राकेशला अटक केली.
बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या सर एचएन हॉस्पिटलच्या लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. हे हॉस्पिटल बॉंबने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीचा फोन हा पहिल्यांदा आला नसून या अगोदर देखील त्यांना धमकी देण्यात आली आहे.