Jaggu and Juliet Movie Trailer – अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची मुख्य भूमिका असलेला जग्गू आणि ज्युलिएट हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून चित्रपटाचा ट्रेलरही ‘तवा फ्राय प्रेमाची, रवा फ्राय लव्ह स्टोरी’ या टॅगलाईनला साजेसा असाच आहे. ट्रेलरमध्ये वर्सोव्यामधील एका आग्री-कोळी कुटुंबातील जग्गू तर टॉप-टीप इंग्लिश झाडणारी ज्युलिएट तुफान मस्ती करताना दिसतायेत.
३ मिनिट ६ संकंदाच्या या ट्रेलरमध्ये, जग्गू ( अमेय वाघ ) एका ट्रीपसाठी गेल्याचं दिसतंय. मात्र गळ्यात सोन्याच्या चैनी, चैनीमध्ये RICH अक्षरं असलेलं भलं मोठं पेंडंट असा कूल ड्युड जग्गू (अमेय वाघ) सोबत सर्व वयोवृद्ध असल्याने भलताच बोर होतो. मग काय? तात्यांना ( उपेंद्र लिमये ) फोन करून तो एकटाच बाहेर फिरायला जायची परमिशन मागतो. तात्याही सोन्याची शप्पथ घेऊन परमिशन देऊन टाकतात.
इथं इंट्री होते ज्युलिएटची! स्टाईलिश कपडे परिधान केलेली एक फर्राटेदार इंग्लिश बोलणारी मुलगी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या जग्गूला दिसते अन् त्याचे डोळेच फिरतात! इंग्लिश बोलणारी ज्युलिएट मराठीही बोलतीये हे समजताच आपला जग्गू ( अमेय वाघ ) ज्युलिएटला ( वैदेही परशुरामी ) ‘जय महाराष्ट्र’ म्हणून मिठीतच घेतो… अन् पुढं काय होतं? उत्सुकता लागलीये ना? तुम्हीच पहा पुढं काय होतंय…
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येणार आहे.