अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’मध्ये डायरेक्टर रोहित शेट्टीने आता चक्क जॅकी श्रॉफला समाविष्ट केले आहे. जॅकीच्या 63 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहित शेट्टीने त्याला आपल्या सिनेमात घेतले आहे. रोहितने इन्स्टाग्रामवर ही गोष्ट जाहीर केली आहे. या सिनेमामध्ये आणखी एक सरप्राईज असणार आहे. पण ते अजूना बाकी आहे, असेही रोहित शेट्टीने म्हटले आहे.
रोहितने एक फोटो शेअर केला आहे,त्यात जॅकी आणि रोहित जंगलामध्ये दिसत आहेत. जॅकी हिरवा शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये कारच्या बॉनेटवर बसला आहे. सिनेमात जरी जॅकी असणार आहे, तरी तो कोणता रोल साकारणार आहे, हे मात्र रोहितने सांगितलेले नाही. जॅकीला एखाद्या गाण्यापुरते घेतलेले नसावे. कदाचित एखाद्या जुन्या पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये जॅकी दिसण्याची शक्यता आहे.
“सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ असणार आहेतच. याशिवाय अजय देवगण, आणि रणवीर सिंह हे दोघेही “सिंघम’ आणि “सिम्बा’च्या रोलमध्येच दिसणार आहेत. 2011 पासून रोहित शेट्टीने कॉप युनिव्हर्सच्या बॅनरखाली पोलिसवाल्या हिरोची सिरीजच सुरू केली आहे. त्यातील तिसरा हिरो म्हणून “सूर्यवंशी’चा अक्षय असणार आहे. “सूर्यवंशी’ 27 मार्चला रिलीज होणार आहे.