मुंबई – व्यंकटेश अय्यरच्या शतकी खेळीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना 5 गडी राखून मुंबईने जिंकला. या वियात सलामीवीर इशान किशनच्या अर्धशतकी खेळीसह बदली कर्णधार सूर्यकुमार यादवसह तिलक वर्मा व टीम डेव्हीड यांच्या उपयुक्त खेळींचा मोलाचा वाटा होता.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन या जोडीने 65 धावांची सलामी दिली. रोहित 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 20 धावा करुन परतला. त्यानंतर इशानने धडाकेबाज फलंदाजी केली. तो अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांवर बाद झाला. नेतृत्व करत असलेला सूर्यकुमार यादव यापूर्वीच्या सामन्यांत अपयशी ठरत होता.
यावेळी मात्र, त्याने जाबदारीने फलंदाजी केली. तिलक वर्माही चांगली फलंदाजी करताना अनावश्यकपणे फटका मारुन बाद झाला. त्याने 25 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. संघाला विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज असताना सूर्यकुमार 25 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 43 धावा करुन परतला. पाठोपाठ नेहाल वधेराही बाद झाला. मात्र, टीम डेव्हीडने नाबाद 24 धावांची खेळी करताना संघाचा विजय साकार केला. या खेळीत त्याने 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
तत्पूर्वी, व्यंकटेश अय्यरने फटकावलेल्या अफलातून शतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 6 बाद 185 अशी समाधानकारक मजल मारता आली. आंद्रे रसेल, रिंकू सिंग व शार्दुल ठाकूर यांनी थोडीफार चमक दाखवली.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवकडे सोपवले गेले होते. कोलकाताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली.
सलामीवीर एन. जगदीशन खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने रेहमनुल्ला गुरबाजच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. गुरबाज 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार नितिश राणा अपयशी ठरला. शार्दुल ठाकूरने 13 धावा करताना अय्यरसह संघाचे शतक धावफलकावर लावले.
अय्यर अनावश्यक फटका मारून बाद झाला. भरात असलेल्या रिंकू सिंगने 18 धावांची खेळी करताना संधाला दीडशतकी मजल मारुन दिली. एका बाजूने अय्यर वादळी फलंदाजी करत होता. त्याने अर्धशतकी टप्पा जसा पार केला तसेच शतकही थाटात साकार केले. मात्र, शतक पूर्ण झाल्यावर लगेचच तो बाद झाला. त्याने 51 चेंडूत 6 चौकार व तब्बल 9 षटकार खेचत 104 धावांची खेळी केली.
पाठोपाठ स्थिरावलेला रिंकू सिंगही बाद झाला. मात्र, त्यापूर्वी त्याने रसेलसह संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. रसेल 11 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 21 धावांवर तर सुनील नरेन 2 धावा काढून नाबाद राहिला. मुंबईकडून ह्रितिक शोकीनने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
अखेर अर्जुनला संधी मिळाली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याला अखेर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अंतिम 11 खेळाडूंच्या संघात मुंबई इंडियन्सने संधी दिली. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची त्याची तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यानेच डावातील पहिले षटक टाकले व केवळ चार धावा दिल्या. मात्र, त्याचे दुसरे षटक महागडे ठरले. यानंतर संपूर्ण सामन्यात त्याला पुन्हा गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने दोन षटकात 17 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 6 बाद 185 धावा. (शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंग 18, व्यंकटेश अय्यर 104, आंद्रे रसेल नाबाद 21, सुनील नरेन नाबाद 2, ह्रितिक शोकीन 2-34). मुंबई इंडियन्स – 17.4 षटकांत 5 बाद 186 धावा. (ईशान किशन 58, सूर्यकुमार यादव 43, तिलक वर्मा 30, रोहित शर्मा 20, टीम डेव्हीड नाबाद 24, कॅमेरुन ग्रीन नाबाद 1, सुयश शर्मा 2-27).