स्टेक्कातो क्युट्रो (इटली) – इटलीच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बोट फुटून झालेल्या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 60 झाली आहे. या दुर्घटनेतील अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे अशाप्रकारे असुरक्षित प्रवास करून युरोपात विस्थापित होणाऱ्यांच्या प्रयत्नांना चाप लागण्याची शक्यता आहे.
रविवारी कॅलेब्रियन किनाऱ्याजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर 80 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र बचावासाठी गेलेल्या पथकाला 60 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये काही मुलांचाही समावेश आहे. आज सकाळी एका युवकाचा मृतदेहदेखील सापडला आहे. बचावलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन कितीतरी जण बेपत्ता आहेत.
विस्थापितांना इटलीला घेऊन जाण्यासाठी निघालेली ही बोट तुर्कीयेमधून निघाली होती आणि या बोटीमध्ये सुमारे 170 जण होते. या बोटीचे अवशेष आणि प्रवाशांचे सामान कॅलाब्रियन समुद्रकिनाऱ्यावर वाहत येऊन विखुरले आहेत. या सामानाच्या ढिगाऱ्यामध्ये काही लाईफ जॅकेट देखील होती. मात्र त्याचा उपयोग दुर्घटनेच्यावेळी करण्यात आला नव्हता, असे स्पष्ट आहे.