नवी दिल्ली – जपानची चांद्र मोहिम “मून स्नायपर’ खराब हवामानामुळे तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने याबाबतची घोषणा आज केली. जपानच्या दक्षिणेकडील तानेगाशिमा या बेटावरून “एच2-ए’ या अवकाश यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते.
या यानातून अमेरिकेची अवकाश संस्था “नासा’ आणि युरोपीय अंतराळ संस्थेने विकसित केलेला संशोधन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार होता. “जपान एरोस्पेस एक्सप्लोरेटरी एजन्सी’ने या अवकाश यानाच्या प्रक्षेपणाची कोणतीही नवीन तारीख जाहीर केलेली नाही.
भारताच्या “चांद्रयान-3’नंतर लगेचच ही मोहीम होणार होती. मात्र खराब हवामानामुळे ही मोहीम पुढे ढकलली गेली. जपानच्या मोहिमेचे रॉकेट तयार करणाऱ्या “एमएचआय लॉंच सर्व्हिसेस’ ने ही मोहीम पुढे ढकलली गेल्याचे सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अंतराळातील वाऱ्यांची दिशा प्रक्षेपणासाठी योग्य नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात भारताच्या अवकाश यानाने चंद्रावर अलगद आणि सुरक्षित लॅन्डिंग केले. त्याच्या दोन दिवस आगोदरच रशियाचे अवकाश यान चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात कोसळले होते.
यापूर्वी केवळ अमेरिका, चीन आणि रशियाच्या अवकाश यानांनी चंद्राच्या पृष्ठबागावर अलगद उतरण्याची कामगिरी यशस्वी केली आहे. चंद्राच्या पॉष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न जपानच्या “ओमोटेनाशी’ या यानानेही पूर्वी केला होता. मात्र त्याचा संपर्क तुटल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाली होती.