धरण पाणलोटात पाऊस सुरूच

भंडारदरा 75 टक्के, आढळाही 55 टक्‍क्‍यांवर पाणीसाठा

भंडारदरा भरल्याची अफवा

भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, अशा प्रकारची अफवा आज उत्तर नगर जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र जलसंपदा विभागाने या वृत्ताचे खंडन केले असून, ही केवळ अफवा आहे. धरण भरलेले नाही. या अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचे आवाहन या विभागाने केले आहे.

 

अकोले  – अकोले तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाने आज सायंकाळी थोडीशी उसंत दिली. मात्र धरणांच्या पाणलोटात मात्र पावसाची हजेरी सुरूच होती. त्यामुळे भंडारदरा धरण 75 टक्के भरले. आढळा धरण 55 टक्के भरले. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्याबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. घाटघर येथे अतिवृष्टी झाली. येथे सात इंच पाऊस झाला.

भंडारदरा धरण “झीरो बॅलन्स’वर आलेले असताना उत्तर नगर जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र वरुणराजाने बळीराजाला व सामान्यांना हात दिल्याने चित्र हळूहळू पालटू लागले आहे. आज सायंकाळी भंडारदरा धरणामध्ये आठ हजार 206 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. त्यामुळे हे धरण 75 टक्‍क्‍यांहून अधिक भरले आहे आणि नजीकच्या काळामध्ये पावसाची स्थिती अशीच राहिली, तर हे धरण आगामी तीन ते चार दिवसांत भरेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाची साठवण क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट इतकी झाली आहे.
आढळा नदीवरील आढळा धरण आज 55 टक्के भरले. या धरणामध्ये दुपारी 584 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. धरणाची साठवण क्षमता 1060 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

भंडारदरा धरणाच्या खालील निळवंडे धरणामध्ये झपाट्याने नवीन पाण्याची आवक वाढत आहे. या धरणाच्या पाणलोटामध्ये कृष्णवंती आणि वाकी तलाव यांचा अंतर्भाव होतो. वाकी धरणाचा आज सायंकाळी एक हजार 574 क्‍युसेक इतका विसर्ग राहिला. त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा साडेतीन टीएमसी हून अधिक झाला. सायंकाळी या धरणात 3542 दलघफू इतका पाणीसाठा झाला होता. हे धरण 41 टक्के इतके भरले आहे.

म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण हे 67 टक्के इतके भरले. या धरणात सकाळी 325 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. या धरणाची साठवण क्षमता 363 दलघफू इतकी असल्याने हे धरणही नजीकच्या काळामध्ये भरेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जायकवाडी धरणामध्ये आज सकाळी 24.644 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.