वीसगाव खोरे, (वार्ताहर) – आपल्या परिसरात येणारे बिबटे व इतर प्राणी ही निसर्गाची संपत्ती आहे. त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन वनरक्षक के. एम. हिमोणे यांनी केले. बाजारवाडी (ता.भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वनदिन साजरा करण्यात आला. जागतिक वन सप्ताह दिनानिमित्त प्रबोधन वर्ग घेण्यात आला.
यावेळी वनक्षेत्रपाल हिमोणे यांनी वनांचे महत्त्व व संवर्धन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते पुढे म्हणाले, आपल्या परिसरात येणारे बिबटे त्याचबरोबर इतर प्राणी ही निसर्गाची संपत्ती असून पर्यावरण साखळीसाठी ते अतिशय महत्त्वाचे घटक आहेत.
तेव्हा त्यांचे संरक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वणवा लावणे यासारख्या घटना फार मोठी हानी घडवत असतात. मुलांनी झाडे लावली पाहिजेत, त्याचे संवर्धन केले पाहिजे. कारण आपण जसजसे मोठे होतो तस तसे मोठी होणारी झाडे आपणाला खूप समाधान देऊन जातात, अशा प्रकारे त्यांनी मुलांच्या प्रश्नांना समर्पक अशी उपयुक्त उत्तरे दिली.
त्यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. शाळेत नुकत्याच झालेल्या चिमणी दिन यासाठी मुलांनी बनवलेल्या घरट्यांची त्यांनी पाहणी केली व मुलांचे कौतुक केले. सुदेश पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी वनरक्षक पी. डी. गुट्टे, वनरक्षक समीर जाधव, के. एम. हिमोणे, के. पी. देठे, मुख्याध्यापक सुरेश खोपडे, शिक्षिका भारती पिंगट व स्वाती चव्हाण उपस्थित होते.