“इस्रो’चे पुढच्या नोव्हेंबरमध्ये चंद्रावर “सॉफ्ट लँडिंग”

बेंगळुरु : यावर्षी चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ पुढच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चांद्रमोहिम राबवणार आहे.

“इस्रो’च्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. प्रस्तावित “चांद्रयान-3′ च्या मोहिमेबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. हा अहवल अद्याप मिळणे बाकी आहे.

ही चांद्रमोहिम पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत आखण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या असल्याचे “इस्रो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये या मोहिमेसाठी अधिक चांगली स्थिती आहे. यावेळी रोव्हर, लॅन्डर आणि लॅन्डिंग ऑपरेशनवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. “चांद्रयान-2′ मोहिमेदरम्यान ज्या त्रुटी राहून गेल्या होत्या, त्या यावेळी दुरुस्त केल्या जातील, असेही या सूत्रांनी सांगितले.

7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण धृवावर विक्रम लॅन्डर उतरवण्याचा प्रयत्न “इस्रो’च्या चांद्रयान-2 मोहिमेतून करण्यात आला होता. लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या 2 मिनिटे आगोदर लॅन्डरशी असलेला संपर्क तुटला होता. या मोहिमेला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्याची कारणे शोधण्यासाठी “इस्रो’च्या “लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर’चे संचालक व्ही. नारायणन यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणतज्ञ आणि “इस्रो’च्या तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने मोहिमेतील त्रुटींबाबत सविस्तर अहवाल तयार केला असून तो अंतराळ आयोगाला सादर केला गेला असावा. पंतप्रधान कार्यालयाची मंजूरी मिळाल्यावर हा अहवाल तो वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही “इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.