इस्लामाबाद – विमान प्रवासास बंदी घातलेल्या “इंटर सर्व्हिस इंटिलिजन्स’ या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल असाद दुरानी यांचे नाव “नो फ्लाय लिस्ट’मधून वगळण्यात यावे, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. दुरानी यांना विदेश प्रवासास बंदी घालावी, असे कोणतेही ठोस कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
ले.जन. दुरानी यांचे नाव 2018 मध्ये “एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये घालण्यात आले होते. या यादीतून आपले नाव वगळण्यात यावे, अशी मागणी ले.जन. दुरानी यांनी एका याचिकेद्वारे केली होती. दुरानी यांच्यासंदर्भातील सर्व नोंदी न्यायालयाने तपासल्या. दुरानी यांचे नाव, जेंव्हा या यादीमध्ये घालण्यात आले तेंव्हा त्यांच्याविरोधात कोणतीही चौकशी सुरू नव्हती. त्यामुळे त्यांना विदेश प्रवासास बंदी घालण्याचे काहीही कारण नाही. इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे ले.जन. दुरानी यांनाही विदेश प्रवासाचा अधिकार आहे, असे न्यायालयाने सांगितले.
दुरानी 2008 पासून भारतीय गुप्तचर संघटना “रिसर्च ऍनालिसिस विंग’ अर्थात “रॉ’च्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्कात होते. तसेच दुरानी यांनी लिहीलेल्या “द स्पाय क्रॉनिकल्स – रॉ, आयएसआय ऍन्ड द इल्युजन ऑफ पीस’ या पुस्तकात पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधितच्या बाबी उघड केल्या आहेत. तसेच त्यामुळे गोपनीयतेच्या कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करून पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दुरानी यांना विदेश प्रवासास अटकाव केला होता. ले. जन. दुरानी यांनी हे पुस्तक भारतीय गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अमरजीत सिंग दुलात यांच्याबरोबर मिळून लिहीले आहे.