पुणे – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कोंढवा येथील आयसीसचे मॉड्युल उद्ध्वस्त केल्याचा अधिकृत दावा केला आहे. त्यांच्या ताब्यात सध्या दोन दहशतवाद्यांसह त्यांना आसरा आणि आर्थिक पुरवठा करणारे पाच जण आहेत. या सर्वांकडे केलेल्या तपासात त्यांनी देशभरात बॉम्बस्फोट करण्याचा कट आखल्याचे उघड झाले आहे. दरम्यान त्यांच्याकडून नव्याने दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि एक कार, एक दुचाकी हस्तगत केल्याचे एटीएसने सांगितले. तसेच बॉम्ब प्रशिक्षण शिबिराच्या जागी पुरून ठेवलेले बॉम्ब बनविण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार कोथरुड पोलिसांनी 18 जुलै रोजी वाहनचोरी करताना मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान(23) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी (24, दोघही मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली होती. तर त्यांच्या पळून गेलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे दोघेही एनआयएने वॉंटेड केलेले दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या दोघांवरही एनआयएने प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. यामुळे हा तपास पुढे एटीएसकडे आला. ते दोघेही रतलाम येथून पळून गेल्यावर आरोपी क्रमांक झुल्फीकार बडोदावालाच्या संपर्कातून पुण्यात आले.
आरोपी सांगण्यावरुन त्यांना आरोपी अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याने आश्रय दिला. त्यांना आश्रय देण्यासाठी आर्थिक पुरवठा करणाऱ्या आरोपी सिमाब नसरुद्दीन काझी (27,रा.कौसरबाग कोंढवा) याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीतील आरोपींकडे केलेल्या तपासात तसेच त्यांचेकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मिळून आलेल्या माहितीद्वारे त्यांचे आयसीस या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन निष्पन्न झाले आहे. आरोपी खान व साकी यांनी जंगल परिसराची रेकी केली तसेच तेथे आपले अस्तित्व लपवण्यासाठी वास्तव्य केले होते. तेथून ड्रोनद्वारे रेकी केली होती. आरोपींनी जंगल परिसरात वास्तव्य करण्यासाठी टेन्ट वापरले होते. ते टेन्ट व इतर साहीत्य ए.टी.एस.ने जप्त केलेले आहे.
आरोपी झुल्फीकार बडोदावाला याने आरोपी साकी व खानसह इतर साथीदारांसाठी बॉम्ब बनविण्याचे शिबिर आयोजित केले होते. आरोपीकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य ज्यामध्ये केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंन्टस् त्यामध्ये थर्मामिटर, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण शिबिर आयोजित करून ज्या ठिकाणी बॉम्बचे साहित्य पुरून ठेवले होते त्याठिकाणाहून केमिकल्स् व केमिकल्स पावडर, इत्यादी हस्तगत केले आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी व फरार साथीदार आरोपी यांनी पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेले एक दुचाकी वाहन ए.टी.एस.ने जप्त केलेले आहे.
डॉ. सरकारचीही इतरांशी लिक?
आयसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यासाठी महाराष्ट्रातील एक गट सक्रीय होता. त्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) मिळाल्यानंतर दोन महिन्यापर्वी मुंबई,ठाणे आणि पुण्यातून जुबेर नूर मोहमंद शेख, अबु नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फीकार अली बडोदावाला याला अटक केली. त्यांच्या तपासातून पुण्यातून डॉ. अदनाल अली सरकार यालाही अटक करण्यात आली. बडोदावाला आणि डॉ.अदनान अली दोघेही नातेवाईक आहेत. यातील बडोदावाल्याने एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले. यानंतर बडोदावाल्याला एटीएसने आर्थर रोड कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे डॉ. सरकारचीही यांच्याशी काही लिंक लागत आहे का?, याचाही तपास केला जाणार आहे.