नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात पाक गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या एका संशयित एजंटला अटक करण्यात आली आहे. रईस असे या संशयित एजंटचे नाव असून तो गोंडा येथील रहिवासी आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.
संशयावरून त्याला “एटीएस’च्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने आपण “आयएसआय’साठी काम करत असल्याचे कबूल केले असल्याचे “एटीएस’चे विशेष महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले.
रईस मुंबईमधील अरमान नावाच्या संपर्कात आला होता. अरमानने रईसला हेरगिरी करण्यासाठी दबाव आणला होता. याच्याबदल्यात त्याला पैसे आणि दुबईमध्ये नोकरी देण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्याला काही महत्वाच्या ठिकाणांचे फोटो पाठवण्यास व्हॉटसऍप कॉलवरून सांगण्यात आले होते. या कामाचे रईसला 15 हजार रुपये मिळाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून अन्य दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत.