फिनिक्स (अमेरिका) – अमेरिकेच्या नैऋत्येकडील भागामध्ये सध्या प्रचंड उष्णतेची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी तापमान प्रचंड वाढल्यामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा व्यक्तींवर उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.
अमेरिकेतील एक तृतीयांश म्हणजे 1 लाख 10 हजार लोकांना या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो आहे. नवाडा, ऍरिझोना आणि कॅलिफोर्नियासारख्या प्रांतांमध्ये ही लाट अधिक तीव्र आहे. येथे दिवसाचे कमाल तापमान 48.8 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 32.2 अंश सेल्सिअस इतके आहे.
फिनिक्समध्ये 13 तापमान गेल्या सलग 110 दिवसांपासून कायम आहे. सर्वाधिक 46.6 अंश सेस्लिअस तापमान शनिवारी नोंदविले गेले. इतका दीर्घ काळ राहिलेला उन्हाळा येथे यापूर्वी 1974 साली होता.
या आठवड्याच्या अखेरीस तापमान सर्वाधिक पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता फिनिक्समधील “नॅशनल वेदर सर्व्हिस’ने वर्तवली आहे. उष्णतेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी सातत्याने आणि भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्लाही दिला गेला आहे.
याशिवाय आपल्या कुटुंबातील आणि शेजारच्या व्यक्तींची काळजी घेण्याची मार्गदर्शक सूचनाही केली गेली आहे. प्रचंड उष्णतेमुळे शक्यतो बाहेर पडणे टाळावे. ही उष्णता घातक ठरू शकते. हा त्रास कोणालाही होऊ शकतो, असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले गेले आहे.
फिनिक्समध्ये 200 हायड्रेशन सेंटर उघडण्यात आली आहेत. तेथे पाण्याच्या बाटल्या वाटल्या जात आहेत. तसेच उन्हाचा त्रास होत असलेल्यांना थंड हवेत बसण्याची आणि विश्रांती घेण्यासाठी लायब्ररी, चर्च आणि उद्योगाशी संबंधित ठिकाणी “कुलिंग सेंटर’ही सुरू करण्यात आली आहेत.
लास वेगासमध्ये कसिनोमध्येही उष्णतेचा त्रास होणाऱ्यांना विश्रांतीची सोय करण्यात आली. टेक्सासपासून कॅलिफोर्नियापर्यंत अनेक ठिकाणी लायब्ररी, पोलीस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी “कुलिंग सेंटर’ सुरू करण्यात आली आहेत. न्यू मेक्सिकोत जलतरण तलाव दीर्घ काळ उघडे ठेवले जाऊ लागले आहेत.