नवी दिल्ली – प्रोटोकॉलनुसार एकाच लसीचे दोन डोस द्यायला हवेत. जर क्वचित एखाद्या प्रकरणी एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या करोना लसीचे डोस दिले गेले असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. ते सुरक्षित आहे. आपण “मिक्स अँड मॅच’ करोना लसीच्या ट्रायलबाबतही विचार करत आहोत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
देशात करोना लसीकरण सुरू झाल्यापासून गोंधळाची परिस्थितीही उद्भवत आहे. करोना लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. सध्या देशात दोन करोना लसींचे डोस दिले जात आहेत. पण एका व्यक्तीने एकाच लसीचे दोन डोस घ्यावे, असा सल्ला दिला जातो आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला करोना लसीचे वेगवेगळे डोस देण्यात आल्याने खळबळ उडाली. यानंतर करोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी डॉ. व्ही. के. पॉल यांनी या शंकेचे निरसन केले आहे.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, एखाद्या प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या करोना लसीचे डोस दिले गेले तरी फार चिंतेच कारण नाही, ते देखील सुरक्षित आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑक्सफर्ड-ऍस्ट्रझेन्का आणि फायझर-बायोएनटेक या लसींचे मिक्स अँड मॅच (दोन्ही मिळवून एक लस बनवणे) बनवण्याचे काम सुरू आहे.
भारतातील एका आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सरकार करोना व्हायरसच्या पहिल्या आणि दुसऱ्या लशीमध्ये मिक्स अँड मॅचचा विचार करत आहे. शास्त्रीय पद्धतीने हे शक्य आहे आणि भारतात ते फायदेशीरही ठरेल. याबाबत भारत आणि विदेशात सुरू असलेल्या संशोधनावर तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.