संघ मालक, खेळाडू व सदस्यांचे डोळे चमकणार
कोलंबो – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) अनिश्चित काळासाठी स्थगित केली असली तरीही ही स्पर्धा आमच्या देशात होऊ शकते, असा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिला आहे. याबाबत बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा अट्टहास करणारी बीसीसीआय येत्या काही दिवसांत हा पर्याय देखील चर्चेला आणू शकते. श्रीलंकेनी दिलेल्या पर्यायावर मंडळातील काही सदस्यांचे तसेच संघमालक व खेळाडूंचे डोळे चमकले असल्याचेही बोलले जात आहे.
करोनाचा धोका वाढल्याने भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे अखेर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शामी सिल्व्हा यांनी आयपीएल आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे.
आयपीएल श्रीलंकेत होत असेल तर त्याला विरोध केला जाणार नाही. यापूर्वी 2009 साली भारतात होणारी आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. बीसीसीआय ही स्पर्धा जुलैमध्ये किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत घेण्याच्या दृष्टिने प्रयत्नशील होती. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याच कालावधीत होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जर रद्द झाली तरच आयपीएलचे आयोजन शक्य होते. त्यावेळी भारतात पावसाचा जोर असतो. मात्र, श्रीलंकेत त्यावेळी पावसाळा संपण्याचा काळ असतो. त्यामुळेच त्यांनी हा प्रस्ताव दिला असून आता बीसीसीआय काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
संघ मालकांची तयारी…
श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिलेल्या प्रस्तावाला समर्थन देत संघ मालकांनी ही स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्यात आली तर त्यात खेळण्याची तयारी दर्शविली आहे. पूर्ण स्पर्धाच रद्द होण्यापेक्षा भारताबाहेर जर खेळविण्यात येऊ शकते अशी परिस्थिती असेल तर त्यात काहीच वावगे नाही, असे काही संघमालकांनी बीसीसीआयला कळविल्याचे सांगितले जात आहे