नवी दिल्ली – आयपीएल 2023 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत काही अतिशय रोमांचक सामने पाहायला मिळाले, ज्यामध्ये अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला. IPL ही जगातील सर्वात मोठी T20 क्रिकेट लीग आहे. आयपीएल म्हणजे नव्या खेळाडूंसाठी स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे व्यासपीठ आहे. हेच काल गुजरातकडून खेळणाऱ्या मोहित शर्माने दाखवून दिले.
मोहितने गुजरात टायटन्सकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्ध दोन महत्वाचे बळी घेतले आणि तो सामनावीरही ठरला. विशेष म्हणजे मोहित तब्बल तीस महिन्यांनंतर आयपीएल सामना खेळत होता. यादरम्यान, त्याला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, परंतु मोहितने हार न मानता दमदार पुनरागमन करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
2013 मध्ये मोहित पहिल्यांदा चर्चेत आला होता
2012/13 रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाचा मोहित प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्या मोसमात तो आठ सामन्यांत ३७ बळी घेऊन स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा बॉलर ठरला होता. चेन्नई सुपर किंग्जने मोहितच्या कामगिरीने प्रभावित होऊन 2013 च्या आयपीएल हंगामासाठी त्याला करारबद्ध केले. चेन्नईचे तत्कालीन गोलंदाजी प्रशिक्षक अँडी बिचेल यांनी एकदिवसीय गोलंदाजी शिबिरानंतर मोहितला शॉर्टलिस्ट केले.
2014 मध्ये पटकावली होती पर्पल कॅप
मोहितने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 15 सामन्यात 20 विकेट घेतल्या. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर भारताकडून झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करताना पहिल्या वनडेत तो सामनावीर ठरला. मोहितने आयपीएल 2014 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यासह पर्पल कॅपचा विजेता देखील होता. त्यानंतर 16 सामन्यात 23 विकेट घेतल्या. 2014 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. भारतीय संघाला त्या वर्षी अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.
2020 च्या हंगामात मोहितला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केले होते, परंतु तेथे तो कोणतीही छाप पाडू शकला नाही. या आयपीएलनंतर मोहितला पाठीची दुखापत झाली आणि तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केल्यानंतर मोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळले. 2022 च्या मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नाही आणि मोहित विकला गेला नाही.
मात्र, लिलावात निवड न होऊनही तो लीगचा भाग राहिला. त्याला गुजरात टायटन्सने नेट बॉलर म्हणून संघात घेतले. मोहितने गुजरातच्या फलंदाजांना नेटमध्ये तयार केले आणि हार मानली नाही. या मोसमात मोहित पुन्हा लिलावात उतरला आणि गुजरातने त्याला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले.
पंजाबच्या दोन महत्वाच्या विकेट्स मिळवल्या
गुरुवारी, जेव्हा तो जवळपास 30 महिन्यांनंतर आयपीएल सामना खेळण्यासाठी उतरला तेव्हा असे वाटले नाही की हा गोलंदाज गेल्या काही वर्षांपासून खेळत नाही. मोहितने पूर्वीप्रमाणेच अचूक लाईन लेंथ गोलंदाजी केली. मोहितने पंजाबविरुद्ध चार षटकांत १८ धावा देत दोन बळी घेतले. यामध्ये जितेश शर्मा आणि सॅम करणच्या दोन महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. अशा स्थितीत त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.